बाप म्हणजे काय? बापाचे महत्व काय आहे? या व यासारख्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देणारी ही कविता. बाप स्वाभिमानी बाणा. कवितेचे लेखक कोण आहेत माहीत नाही. पण कविता वाचून अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.
बाप स्वाभिमानी बाणा कविता | Baap Swabhimani Bana
बाप स्वाभिमानी बाणा , बाप कणखर कणा
त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना
त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब
त्याच्या घामाच्या थेंबाना, हिऱ्यामोत्याचा रुबाब...
बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल
बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल
बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर
जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर...
उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी
शिव्याशाप या जगाचे बाप घेतो सारे माथी
घर बायको नि मुले यांना जगवन्यासाठी
बाप होतो वेडापिसा एका एका पैश्यासाठी...
बाप म्हणजे जणू की वाल्याकोल्याची जमात
ज्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी
बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा
त्याच्या डोळ्यातील थेंब कोणा दिसणार कसा?
बाप साठवतो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची
जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी...
ज्याने जपले मुलांना तळहाती पाकळ्यात
अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात... !
बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार
नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर
बाप म्हणजे असे की एक झाडचअबोली
बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली.
तर मित्रहो कशी वाटली बाप स्वाभिमानी बाणा मराठी कविता ? कमेन्ट करून नक्की सांगा. आणि जर आपणास माहीत असेल की या कवितेचे लेखक कोण आहेत तर टे देखील कमेन्ट मध्ये कळवा. धन्यवाद..
लेखक माहीत नाही कोणालाच
ردحذفإرسال تعليق